Description

महाराष्ट्र, प्रामुख्याने सह्याद्रीतील गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यावरण विकासाच्या दृष्टीने पाऊले टाकत सुरु केलेल्या ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन’ या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष. एखाद्या कामाची सुरवात करणे सोपे असते, मात्र त्यामध्ये सातत्य ठेवणे कठीण असते. मात्र आपल्या सगळ्यांच्याच आधाराने आणि आशीर्वादाने आपण दुसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे.

या वर्षीचे ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलन – २०१४’, एप्रिल महिन्याच्या १२ व १३ तारखेला, मुंबईतील दादर येथे असणाऱ्या ‘ब्राह्मण सेवा मंडळ’ येथे आयोजित केले गेले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक उपयुक्त विषय आणि स्थळांच्या माहितीने परिपूर्ण असणारे संमेलन गिर्यारोहक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

संमेलनातील प्रवेश ‘विनामुल्य’ असेल मात्र त्यासाठी आमच्या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी लागेल. त्यासाठी पुढील  लिंकचा वापर करावा.

या वर्षीच्या संमेलनात, ‘सह्याद्री मित्र छायाचित्रण’ स्पर्धेसाठी ठरवण्यात आलेला विषय आहे – ‘ महाराष्ट्रातील अपरिचित गडकिल्ले’

छायाचित्रण स्पर्धेत भाग घेण्यासाठी माहिती पुढील लिंकद्वारे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

या वर्षीच्या संमेलनाची रूपरेषा पुढे प्रस्तुत केली आहे.

संमेलनाची सुरुवात १२ तारखेला सकाळी ०९:३० वाजता उद्घाटनाने होईल. संमेलनाचे उद्घाटन माननीय इतिहासतज्ञ श्री. अप्पा परब यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. सकाळपासूनच छायाचित्रण स्पर्धेत भाग घेलेल्या स्पर्धकांच्या प्रवेशिकांतून विजयी छायाचित्रांचे काही निवडक छायाचित्रांसह प्रदर्शन भरविण्यात येईल. हे प्रदर्शन १२ तारखेच्या सकाळी १०:०० वाजल्यापासून १३ तारखेच्या सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले राहील.

संमेलनाच्या दोन दिवसांमध्ये सादर होणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे:

दिवस पहिला – १२ एप्रिल २०१४ (शनिवार)

०९:३० – उद्घाटन

१०:०० – ‘महाराष्ट्रातील अपरिचित गडकिल्ले’ - छायाचित्र प्रदर्शन

१५:०० – सह्याद्री मित्र स्नेह संमेलन – ओळख

१५:१५ – ‘भ्रमंतीतून अभ्यास’ - श्रीमती शिल्पा परब

१६:०० – ‘टायगर सायक्लोवॉक’ – श्री सुनील जोशी

१६:४५ – मध्यंतर

१७:०० – दुर्गवीर – ध्यास दुर्गसंवर्धनाचा

१८:०० – आभारप्रदर्शन आणि सांगता

 

दिवस दुसरा – १३ एप्रिल २०१४ (रविवार)

०९:३० – ‘महाराष्ट्रातील अपरिचित गडकिल्ले’ - छायाचित्र प्रदर्शन

१५:०० – ‘सह्याद्रीतील ऑफबीट लढाया’ – श्री ओंकार ओक

१५:४५ – ‘गद्धेगाळ – प्राचीन लेखांतील शापवाचने ’ – डॉ. रुपाली मोकाशी

१६:१५ – ‘मुंबई परिसरातील लेणी’ – श्री पंकज समेळ

१६:४५ – मध्यंतर

१७:०० – ‘उंच माझा झोका’ – श्री अरुण सावंत

१७:३० – ‘सह्याद्री मित्र सन्मान’ पुरस्कार वितरण समारंभ

१९:०० – आभारप्रदर्शन आणि सांगता

प्रदर्शनादरम्यान, दोन्ही दिवस, प्रसिद्ध इतिहासतज्ञ माननीय श्री अप्पा परब यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. ऐतिहासिक प्रसंगांचे संदर्भ जोडत एका वेगळ्या आणि सार्थ दृष्टीकोनातून जमविलेली माहिती आपल्या समोर या पुस्तकांच्या स्वरुपात सादर केली आहे. आपल्याला आवडलेली, मुळात अल्प किमतींची ही पुस्तके खरेदी करण्याची संधीही आपल्याला या प्रदर्शनादरम्यान मिळणार आहे.

गिर्यारोहण, पर्यटन सुकर करण्यासाठी आज अनेक कंपन्यांनी उत्तमोत्तम साधनसामग्री बाजारात आणली आहे. अशा अत्यावश्यक साधनसामग्रीचेही प्रदर्शन, ‘स्ट्रॉब’ अॅडव्हेंचर शॉपद्वारे, दोन्ही दिवस करण्यात येणार आहे. अशी सामग्री मिळण्याची ठिकाणे अनेकांना माहित नसतात त्यामुळे ती विकत घेण्यासाठी शोधाशोध करावी लागते. म्हणून या प्रदर्शनादरम्यान आपल्याला आवश्यक ती साधने अल्प दरात ‘स्ट्रॉब’ अॅडव्हेंचर शॉपद्वारे आपल्या प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ ह्या दुर्गसंवर्धक संस्थेच्या कार्याचा आढावा छायाचित्रांच्या मार्फत आपल्याला घेता येईल. तसेच आपापल्या विभागातील, म्हणजेच गिर्यारोहण, पर्यटन आणि पर्यटन या विषयांत काम करणाऱ्या अनेक मंडळींशी ओळख करून घेता येईल, ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल.

तर मग आजच नोंदणी करा आणि संमेलनाला नक्की या.. सह्याद्री मित्र आपली वाट पाहत आहेत..